बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार : किल्ले गाळणा
आवर्जून वाचाच

बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार : किल्ले गाळणा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । गोकुळ पवार : मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. आठ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, अनेक कातळ कोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे. त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून ओळखला जातो.

मालेगाव जवळील गाळणा हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. या गावात प्रवेश करतांना एका उध्वस्त दरवाजातुन आपल्याला जावे लागते. यावरून पुर्वी संपुर्ण गाळणा गावाला तटबंदी असावी असे जाणवते. साधारण गाळणा किल्ल्याचा परिसराची सुरवातच या प्रवेशद्वारातून होते. या दरवाज्याच्या आजुबाजुला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. गावांत किल्याच्या पायथ्याशी नाथपंथीय गोरखनाथ शिवपंचायतन मंदिर आहे. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यास एकच मार्ग असून परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा व लाखा दरवाजा अशी अजस्त्र दरवाज्यांची मालिकाच या मार्गावर उभारण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांच्या एका पाठोपाठ एक मालिकेमुळे एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे हा गड त्याकाळी अभेद्य मानला जात असे.

समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची २३१६ फूट असून पायथ्यापासून अंदाजे ६०० फुट उंच हा किल्ला चढायला अर्धा-पाऊण तास पुरतो. एका आश्रमाच्या बाजूने गेल्यास अवघ्या दहा मिनीटांतच किल्ल्याच्या कमलपुष्प कोरलेल्या पहिल्या पुर्वाभिमुख परकोट प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. या प्रवेशद्वारास जिबिचा दरवाजा म्हणजे चौकशी दरवाजा असेही म्हणतात. यांनतर दुसरा दरवाजा तो म्हणजे दोन बुरुजांच्या आधाराने भरभक्कम व सुस्थितीत असणारा पश्चिमाभिमुख लोखंडी दरवाज़ा होय. त्यांनतर लागूनच आतील दरवाजा, डाव्या बाजूने येणारा चोर दरवाजा, कोतवाल पीर दरवाजापाशी येतो. नंतर २० पाय-या चढून गेल्यानंतर काही अंतरावरचा चौथा लोखंडी दरवाज़ा आहे. यांनतर सर्वात शेवटी गुप्त दरवाजा लागतो. यावरून आपल्याला या किल्ल्याची अभेद्यता लक्षात येते.

यानंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहचलेले असतो. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे व्यवस्थित दिसतात. या ठिकाणी अनेक गुहा पाहावयास मिळतात. यांनतर पाण्याचे टाके पाहत तटबंदी ओलांडून माथ्यावर एक मशीद नजरेस पडते. मशिदीच्या डाव्या हाताला हौद पाहायला मिळतो. येथील पाणी गरम करण्याचा चुलांगन, खापरी नळ, आंघोळीचे टाके इत्यादी पहाण्यासारखे आहे. येथून जवळच असलेल्या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व दोन शिल्पे आढळतात. किल्ल्यावर मशीदीच्या मागच्या बाजूस असेलेले एकमेव तळे दिसून येते. यांनतर मशिदीच्या पुढे गेल्यांनतर काही वाड्यांचे अवशेष दिसून येतात. बुरुजावरील शिलालेख आकर्षित करतात. येथेच असणारी एका विहिरीत किल्ल्याची दगडी प्रतिकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यावरून खानदेश मुलूख व लळिंग किल्ला तर पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर किल्ले नजरेस पडतात.

दरम्यान पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. गाळणा किल्ला हा पर्यटकांचा कुतूहलाचा विषय असून या किल्ल्यास भेट द्यायलाच हवी.!

Deshdoot
www.deshdoot.com