चला भटकंतीला : सोळा ओळींचा भव्य शिलालेख असलेला ‘हतगड’ 
आवर्जून वाचाच

चला भटकंतीला : सोळा ओळींचा भव्य शिलालेख असलेला ‘हतगड’ 

Gokul Pawar

नाशिक : गोकुळ पवार । महाराष्ट्र व गुजरात सीमेवर वसलेल्या सुरगाणा तालुक्यात सातमाळ रांगेतील आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हतगड. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत संस्कृत भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख या किल्ल्यावर आहे. त्यामुळे या किल्ल्याचा बहुतांश इतिहास शिलालेखांत आढळतो. त्यामुळे भव्य शिलालेखाचा मानकरी म्हणून हतगड किल्ल्याची ओळख आहे.

नाशिकपासून सापुतारा कडे जातांना वणी गाव ओलांडल्यानंतर रस्त्याच्या कडेला आडवा पहुडलेला हतगड पर्यटकांना आकर्षित करतो. हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे सिमेवरचा गड. हतगडच्या अलीकडे महाराष्ट्र तर पलीकडे गुजरात सुरू होते. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्किद १३०० ते १७०० अशी आहे. हतगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. ४७० वर्षांपूर्वीचा देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख अजूनही किल्ल्यावर पाहावयास मिळतो.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हातगाडवाडी तुन किल्ल्यावर पायवाटेने प्रवेश करावा लागतो. गडावर प्रवेश करण्यापूर्वी कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. बाजूला असलेल्या दरवाज्याच्या जवळच दोन शिलालेख आढळून येतात. या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत जाता येते. यानंतर अनुक्रमे गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण असून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा गेलेल्या आहेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर गडाची एकसलग तटबंदी असून तिच्यात एक छोटीशी कमानही आहे. येथून बाहेर पडल्यानंतर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात. थोडे खाली उतरल्यावर पाण्याचा एक तलाव दिसून येतो. यावर एक ध्वजस्तंभ पाहावयास मिळतो. याचबरोबर दोन कोठारं, शिवलिंग व नंदी, एक सुटा बुरुज,राजवाड्याचे व इतर बांधकामांचे भग्नावशेष आपल्याला आढळून येतात. नाशिक – सापुतारा सारख्या व्यापारी मार्गावर वसलेला हा किल्ला परिवारासहित अगदी सहज भेट देण्यासारखा आहे.

जायचे कसे ?
नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे. बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर गडाच्या पायथ्याशी असलेले हतगडवाडी गाव आहे. हातगडवाडीतुन डाव्या बाजूला एक बुजलेली विहीर लागते. यानंतर आंब्याचे झाड लागते अन येथून किल्ल्याला सुरवात होते.

भव्य शिलालेख
हातगड किल्ल्यावर ४७० वर्षांपूर्वीचा, सोळा ओळींचा, चार फूट उंच व दोन फूट चार इंच रुंदीचा आहे,. यातील अक्षरे तीन इंच उंचीची असून हा शिलालेख जमिनीपासून साडे सहा फूट उंचावर आहे.

Deshdoot
www.deshdoot.com