पारावरच्या गप्पा : गावकऱ्यांनो, चला स्वच्छतेचा जागर मांडूया ..!
आवर्जून वाचाच

पारावरच्या गप्पा : गावकऱ्यांनो, चला स्वच्छतेचा जागर मांडूया ..!

Gokul Pawar

Gokul Pawar

(तान्या, बाळ्या, संत्या, विज्या, कुंदन, खंडू व इतर शहाणी मंडळी बसलेली )

कुंदन : काय म्हणताय मित्रांनो? काय चाललंय आपल्या गावात ..
तान्या ; समदं बेस हाय.. तू कवा चमकला?
कुंदन : कालच आलो…
संत्या : बरी गावाची आठवण आली तुला? काही विशेष काम काढल्याबिगर तू येयाचा न्हाय..
कुंदन : अरे एक प्रोजेक्ट करायचा गावावर..म्हणलं आपल्याच गावावर करूया ..

विज्या : कसलं प्रोजेक्ट ?
कुंदन : स्वच्छतेवर?
खंडू : स्वच्छतेवरून आठवलं , आपल्या शेजारच्या गावाला आदर्श ग्राम स्वच्छता पुरस्कार मिळाला म्हण …
कुंदन : व्हय मिळाला ना…
बाळ्या : मग आपल्या गावाला पण मिळाला पाहिजे…

कुंदन : मिळेल ना.. पण त्याआधी गाव स्वच्छ असले पाहिजे, हागणदारीमुक्त पाहिजे… कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणारे पाहिजे …
तान्या : म्हणजे हाच तुझ्या प्रोजेक्टचा विषय आहे तर.. म्हणून आपलंच गाव निवडलंस व्हय…
कुंदन : हो.. आपल्या गावाचाच सर्वे करून तो प्रोजेक्ट तयार करायचा हाय.. तेव्हाच आपल्या गावालाबी पुरस्कार मिळेल.
संत्या : पण आपल्या गावात समद्या योजना राबविल्या जात्यात.. नळ पाणी पुरवठा, हागणदारीमुक्त गाव, रस्ते, वीज ..मग काय झालं…
कुंदन : रस्ते वीज तर बऱ्यापैकी आलेत. पाणी बी कैक ठिकाणी आलंय .. पण स्वच्छतेचं काय… अजुनबी लोक उघड्यावर जात्यात.. अन म्हण हागणदारीमुक्त गाव…

विज्या : ग्रामपंचायतींनी याबाबत लक्ष घातले पाहिजे.. लोकांचं काय?
कुंदन : स्वच्छतेचा मंत्र देणारे गाडगेबाबा म्हणायचे रामधुनपूर्वी गावं पूर्ण, व्हावे स्वच्छ, सोंदर्यवान | कोणाही घरी गलिच्छपण न दिसावे | खर्या अर्थाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरवात करायला हवी. गावाच्या विकासात लोकांचाही सहभाग महत्वाचा आहे. त्यावेळी गाडगेबाबांना स्वच्छतेचे महत्व पटले… त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ते जनमाणसापर्यंत पोहचवले. पण अद्यापही आपली जनता याबाबत सजग झाली नाही.
खंडू : खरं आहे, गावचा विकास साधायचा असेल तर आपणही यात सहभागी व्हायला पाहिजे. पण तस होत नाही.. चाललंय चाललंय

कुंदन : गाडगेबाबा सुरवातीला वातावरण स्वच्छ करायचे मग शरीर स्वच्छ करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचे….तस आपणही लोकांना स्वच्छेतच महत्व पटवून देऊया.. ग्रामपंचायतीला देखील यात पुढाकार घ्यायला सांगूया.. मग आपले गाव स्वच्छ झालेच म्हणून समजा …
बाळ्या : मला एक प्रश्न पडलाय.. आपल्याकडं उन्हाळ्यात पाण्याचं लय तोटा असतुया …
कुंदन : अरे ग्रामपंचायती कडून पाण्याचे योग्य नियोजन करून घेउया..जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात देखील पाणी वापरता येईल.

तान्या : व्हय हे अगदी बेस होईल…
खंडू : तुम्हाला सांगायचंच राहील.. मंदिरात संत गाडगेबाबा जयंतीचा कार्यक्रम हाय … चला जाऊया..
कुंदन : हो चला… स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या गाडगेबाबांना वंदन करून आपल्या कामाला सुरवात करूया…

Deshdoot
www.deshdoot.com