Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमहावितरण देणार सुरक्षा ठेवीवरील व्याज!

महावितरण देणार सुरक्षा ठेवीवरील व्याज!

औरंगाबाद – aurangabad

वीज जोडणी देताना ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा ठेवीवरील साडेऐकवीस कोटींचे व्याज (MSEDCL) महावितरणकडून परत दिले जाणार आहे. (Marathwada) मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलातील ३८ लाख ३४ हजार १३१ वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार असून हा परतावा दोन हप्त्यांत दिला जाणार आहे व वीज बिलात ही रक्‍कम समायोजित होणार आहे.

- Advertisement -

महावितरण कंपनीकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सिंगल फेज, थ्रीफेज ग्राहकांना विद्युत भार लक्षात घेऊन सुरक्षा ठेव आकारली जाते. वीज ग्राहकांसाठी मागील १२ महिन्यांतील वीज देयकाची सरासरी काढून एक महिन्याची रक्‍कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. १ एप्रिल २०२२ पासून नबीन नियमावलीनुसार आता दोन महिन्यांची रक्‍कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येत आहे. मागील १२ महिन्यांतील वीज देयकांची सरासरी हा घटक महत्त्वाचा घटक असल्याने वीज वापर हा महत्त्वाचा ठरत आहे. वीज ग्राहक महावितरणला पूर्वकल्पना न देताच स्थलांतर करतात. यावेळी थकित वीजबिल भरणा केला जात नाही.

दुसरीकडे महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांपर्यंत वाटप होईपर्यंत साधारण दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागतो. तरीही, महावितरणकडून विनाखंड वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे ग्राहकांकडून सुरक्षा ठेव घेतली जाते. एक महिन्याऐवजी आता दोन बिलांची रक्‍कम जमा करून घेतली जात आहे. १२ महिने वेळेत व नियमित वीजबिल भरणाऱ्याच्या सुरक्षा ठेवीवर बँकेतील व्याजदराप्रमाणे व्याजही दिले जाते.

औरंगाबाद परिमंडलात १३ लाख १२ हजार ९७२ वीज ग्राहकांना ७ कोटी ९७ लाख २७ हजार रुपये, लातूर परिमंडलात १३ लाख ९५ हजार ५१ वीज ग्राहकांना ७ कोटी ६० लाख ५० हजार रुपये तर नांदेड परिमंडलात १२ लाख २६ हजार १०८ वीज ग्राहकांना ५ कोटी ९१ लाख ४३ हजार रूपये सुरक्षा ठेव रकमेवर व्याज देण्यात येणार आहे. सुरक्षा ठेवीवर व्याजाचा परतावा वीज बिलाच्या माध्यमातून मे व जून महिन्याच्या वीज बिलांमध्ये समायोजित करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या