लसीकरणात महावितरणची आघाडी

80 टक्के कर्मचार्‍यांचे लसीकरण
लसीकरणात महावितरणची आघाडी

औरंगाबाद - Aurangabad

महावितरणने (MSEDCL) कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला आहे. आतापर्यंत एकूण 79.4 टक्के कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 59 हजार 799 नियमित व बाह्यस्रोत कर्मचार्‍यांचा समावेश आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कार्यरत महावितरणच्या नियमित व बाह्यस्रोत कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona preventive vaccine) देण्यासाठी महावितरणकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 34 जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला असून त्याचा लसीकरणासाठी मोठा लाभ झाला आहे. एक महिन्यापूर्वी महावितरणमधील सुमारे 47 टक्के कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, वीज कर्मचार्‍यांची दैनंदिन कामे ही आरोग्य व पोलीस विभागांप्रमाणेच अत्यावश्यक असल्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे तसेच परिमंडल समन्वय कक्षाचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याकामी पुढाकार घेत थेट जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. परिणामी लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या महिन्याभरात 79.4 टक्क्यांवर गेली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 58 कर्मचार्‍यांना लसीचा दुसरा डोसदेखील देण्यात आला असल्याचे महावितरणने कळविले आहे.

कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी परिमंडल व मुख्यालय स्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत असून या ठिकाणी चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या 15 दिवसांमध्ये उर्वरित सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे असे आवाहन सिंघल यांनी केले आहे.

महावितरणमध्ये कार्यरत 75 हजार 323 पैकी आतापर्यंत 59 हजार 799 (79.4 टक्के) नियमित व बाह्यस्रोत कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक बारामती परिमंडलात 91.2 टक्के झाले आहे. तसेच पुणे व कोल्हापूर 87.84, कल्याण 85.9, औरंगाबाद 84.1, कोकण 82.2, भांडूप 81.5, नांदेड 80.9, जळगाव 80.2, अमरावती 77.9, नागपूर 74, अकोला 73.2, नाशिक 73.5, चंद्रपूर 71.5 , गोदिंया 70.4 आणि लातूर परिमंडलामध्ये 65.9 टक्के कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com