औरंगाबाद Aurangabad
फटाका कारखान्याला संमती देण्यासाठी एक लाखाची (bribe) मागणी करून ६० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (MPCB officer) क्षेत्रीय अधिकारी अर्जुन वसराम राठोड (५७) यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Anti-Corruption Squad) सोमवारी रंगेहाथ पकडत अटक केली. लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने राठोड याच्या घरावर छापा मारून झाडाझडतीला सुरुवात केली. मात्र, यात किती कोटींचे घबाड सापडले हे मात्र कळू शकले नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावामध्ये शिवछत्रपती फायर वर्कर्स नावाच्या फटाक्याच्या कारखान्यासाठी संमतीपत्र मिळविण्यासाठी कारखानामालकाने धूत हॉस्पिटलजवळील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. क्षेत्रीय अधिकारी अर्जुन वसराम राठोड (५७) याने संमतीपत्र देण्यासाठी एक लाखाची मागणी केली. यावरून कारखानामालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीवरून उपअधीक्षक दिलीप साबळे यांनी शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांच्याकडे सोपविला.
पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी तक्रारीची शहानिशा केली असता क्षेत्रीय अधिकारी अर्जुन राठोड याने एक लाखाची मागणी करत पंचांसमक्ष ६० हजारांमध्ये तडजोड केल्याचे निष्पन्न झाले. यावरून सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हनुमंत वारे यांच्या पथकाने कार्यालयात सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे अर्जुन राठोड याने लाचेची ६० हजारांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप मारून त्यास अटक केली. विशेष म्हणजे एक वर्षानंतर राठोड हे निवृत्त होणार होते. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.