खासदार जलील यांच्याकडून नियमांची पायमल्ली

संचारबंदीत रंगला कव्वालीचा कार्यक्रम
खासदार जलील यांच्याकडून नियमांची पायमल्ली

औरंगाबाद - Aurangabad

राज्यभरात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. त्यातच डेल्टा प्लसची (Delta Plus) तिसरी लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना खुद्द लोकप्रतिनिधी असलेले खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्याकडूनच नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे पहायला मिळाले. दौलताबादेत (Daulatabad) रंगलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सत्य समोर आले. सामान्य नागरिकांसमोरच नियमांची बाराखडी वाचली जात असल्याची चर्चाही या अनुषंगाने रविवारी रंगली.

औरंगाबाद शहरवासियांनी गेल्या वर्षभरात कोरोनामुळे नजीकच्या नातेवाईक, मित्रांना गमावले आहे. एकेकाळी कोरोनामुळे औरंगाबादकरांनी स्मशानभूमीत मृतदेहांचा खच पाहिला आहे. या परिस्थितीतून आता औरंगाबादकर कुठे सावरायला लागले आहेत. एकीकडे तिस-या लाटेची भिती आहे. तर दुसरीकडे औरंगाबादच्या सीमेवर यमरुपी डेल्टा दरवाजा ठोठावत आहे. अशी परिस्थिती असताना विकेंड लॉकडाऊनमध्ये मध्यरात्रीपर्यंत कोरोनाचा एकही नियम न पाळता कव्वालीचा फड आणि पैशांची उधळण एका सुशिक्षीत संसदपटूला शोभते का ? असा प्रश्न आता औरंगाबादकर विचारत आहेत.

(Collector) जिल्हाधिका-यांच्या आदेशाने शहरात विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. असे असतानाही खुद्द खासदारांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत दौलताबादेतील एका फार्म हाऊसवर कव्वालीचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी अक्षरश: पैशांचा पाऊस देखील पाडल्याचा (Video) व्हिडीओ समोर आला आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे वागताना दिसून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचीच गळचेपी होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठितांकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना दंड व शिक्षेला सामोरे जावे लागते. हे नेहमीच पहायला मिळते.

दौलताबादेतील एका फार्म हाऊसवर एमआयएमचा जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, सोहेल जकीऊद्दीन, रतीक खान कलीम खान यांनी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी खासदार इम्तियाज जलील हजर राहिले. या कार्यक्रमात व्यासपीठावर पोहोचताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी खासदार जलील यांच्यावर पैशांची अक्षरश: उधळण केली. या कार्यक्रमासंबंधीची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी कर्मचा-यांसह धाव घेतली. त्यानंतर हा कार्यक्रम रात्री बारा वाजेच्या दरम्यान बंद पाडण्यात आला. रात्री सोहेल जकीऊद्दीन, समीर साजेद बिल्डर, नासेर सिद्दीकी, रतीक खान यांच्यासह 50 ते 60 जणांविरुध्द दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांनाच नियमांची बाराखडी शिकवली जाते. प्रशासनाकडून नेहमी छोट्या व्यापा-यांवर कारवाई केली जाते. मास्क न वापरणार्‍या नागरिकांना दंडाच्या पावत्या दिल्या जातात. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती ढासाळलेली असताना खासदारांवर पैशांचा पाऊस पाडला जातोय हे शोभनीय आहे का? असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com