वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे महिलांमध्ये अधिक अंधश्रद्धा-प्रा.सविता शेट्टे

वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे महिलांमध्ये अधिक अंधश्रद्धा-प्रा.सविता शेट्टे

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात सुशिक्षित लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अंधश्रद्धा पहायला मिळतात. विज्ञान शिकले म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन मिळालाच असे होत नाही. तो जाणीवपूर्वक विकसित करावा लागतो, असे मत प्रा. डॉ. सविता शेट्टे यांनी व्यक्त केले.

सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ सभागृह येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले. यावेळी डॉ. सविता शेट्टी यांनी स्त्री प्रश्न आणि समाजकारण, स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, महिलांना कायम डावी बाजू दिली जाते. त्यातून त्यांचे दुय्यमत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांच्या बाबतीतील अनेक प्रश्न हे व्यवस्थेने निर्माण केलेले आहे. महिलांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहे परंतु, त्याची जाणीव त्यांच्यामध्ये नाही. यासाठी विवेकवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कार्यकर्ता म्हणजे काय या विषयावर डॉ. स्मिता अवचार तसेच सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी भाष्य केले. डॉ. अवचार म्हणाल्या की, संविधानाने दिलेले माणूसपण हे अधिक महत्त्वाचे आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 'मी' 'आम्ही' आणि 'ते' या तीन गोष्टीभोवती व्यक्तिमत्त्व फिरता कामा नये. आपले वागणे संविधानावर आधारित असले पाहिजे. समूह कामात अधिक यश मिळते. चांगले ऐकून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. नेतृत्वही जरी प्रत्येकाची इच्छा असली तरी नेतृत्वासाठी वेगळ्या गुणांची आवश्यकता असते. याबाबतची मांडणी त्यांनी केली. सुदृढ संवाद महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी भाषा कोणती वापरावी हे देखील समजले पाहिजे. हल्ली प्रत्येक जण स्वतःला समुपदेशक समजायला लागलेला आहे. वेळ आहे म्हणून समुपदेशक होऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

डॉ. मंगल खिवंसरा यांनीही आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विचार एक, आचरण वेगळेच ही विसंगती आहे.अनेक वर्षाचे काम आणि अनुभव तुम्हाला कार्यकर्ता म्हणून घडवत असतो. कधी-कधी तात्काळ प्रतिक्रिया ही द्यावी लागते. त्याबाबतचे भान विकसित होणे गरजेचे आहे. समोरच्याची नाळ ओळखणे गरजेचे तसेच कार्यकर्त्याला आरोप-प्रत्यारोप स्वीकारून पुढे जाता आले पाहिजे. आपल्या कमाईतील एक हिस्सा समाजकार्यासाठी देता आला पाहिजे. तशीच नीतिमूल्ये सांभाळून नैतिकता जोपासणे गरजेचे आहे, असेही खिवंसरा त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी केले. तर आभार डॉ. रश्मी बोरीकर यांनी मांडले. या शिबिरासाठी ज्योती नांदेडकर, डॉ. रेणू बोरीकर-चव्हाण, ॲड. गीता देशपांडे, सुलभा खंदारे, डॉ. अनुश्री मधाळे, विमल विसपूते, डॉ. मंजुषा शेरकर, ॲड. सुजाता पाठक, ॲड. सुनंदा सनेर, सुनिता जाधव, मीना खंडागळे, कीर्ती जाधव, मंजुषा माळवतकर, शकीला पठाण, तृप्ती डिग्गीकर यांची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com