दुर्गम भागासाठी मोबाईल मेडिकल व्हॅन ठरणार 'आरोग्यदूत'

राज्य शासनाचा स्तुत्य उपक्रम 
दुर्गम भागासाठी मोबाईल मेडिकल व्हॅन ठरणार 'आरोग्यदूत'

औरंगाबाद - Aurangabad

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत गाव-खेड्यातील, दुर्गम व आदिवासी भागात असणाऱ्या आरोग्य सुविधेत भर घालून मोबाईल मेडिकल व्हॅन ही आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदूत म्हणून सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणारी ठरेल असे मत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मेडिकल मोबाईल व्हॅनचे उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, मोबाईल व्हॅनच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली निरवे हे उपस्थित होते. याप्रसंगी मोबाईल व्हॅनमध्ये सुसज्ज असलेल्या सेवासुविधा या विषयी डॉ. वैशाली निरवे यांनी माहिती दिली. यामध्ये गर्भवती महिला व नवजात बालकांच्या आरोग्याविषयीच्या सुविधांबरोबरच सामान्य बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असलेले उपचार व औषधी याविषयीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या मोबाईल व्हॅनमध्ये विविध आरोग्य तपासण्या करण्याची सोय उपलब्ध असल्याने ग्रामीण भागामध्ये आजारी रुग्णांना या व्हॅनमध्येच रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, फुफ्फुसाचे आजार, मुत्रविकार, एचआयव्ही व रक्ताविषयीच्या तपासण्या या ठिकाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दारात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये मेडिकल मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरेल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

सदरील मेडिकल मोबाईल व्हॅन औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी क्षेत्रात आरोग्य सेवा देणार असून यामध्ये सोयगाव, सिल्लोड, वैजापूर, अंजिठा या भागाचा विशेषत: समावेश असणार आहे. या भागांमध्ये ही मोबाईल मेडिकल व्हॅन नियोजनानुसार फिरणार आहे. एका दिवसात किमान नव्वद व्यक्तींची तपासणी आणि उपचार करण्याची क्षमता या मोबाईल व्हॅनसह वैद्यकीय पथकाची असेल. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका, दोन वाहन चालक आणि निरीक्षक यांच्या माध्यमातून ही मोबाईल मेडिकल व्हॅन जिल्ह्यातील गरजू, गरिब आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार आहे.

याप्रसंगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय सानप, औषध निर्माता जयश्री भोजने, परिचारिका शिल्पा त्रिभवून वैद्यकीय निरीक्षक नाना साबळे यांच्यासह व्हॅन चालक मनोज शेळके हे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com