Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदूध दरासंदर्भात निर्णय नाही

दूध दरासंदर्भात निर्णय नाही

मुंबई|Mumbai

दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनाची आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे पशु आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात दरवाढीसंदर्भात तोडगा निघाला नाही. जो पर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलन नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या बैठकीत शेतकरी संघटनांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या असून त्याबाबत लवकरच राज्य सरकार निर्णय घेईल असे सरकारकडून सांगण्यात आले. स्वाभिमानीच्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत आणि इतर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीनंतर बोलताना दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार म्हणाले की, महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आम्ही चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक घेतली असे नाही तर आधीच नियोजित होती. मी स्वत:ही बैठक 16 जुलैला बोलवली होती. या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या, असे पशु आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार म्हणाले.

ते म्हणाले की, करोना संकटामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दूध उत्पादकाना मदत करण्याची आमची भूमिका आहे. गेल्या सरकारने पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे, असेही सुनील केदार यांनी सांगितले.

केदार म्हणाले की, दूध भुकटीचा निर्णय आम्ही घेतला, ही मागणी कोणत्याही पक्षाने केली नव्हती, आम्ही स्वत:हून हा चांगला निर्णय घेतला. दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले, अशीही माहिती पशु-दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, असा इशारा या बैठकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला त्याबाबत शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुधाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे.

संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्यभरात दुधाचे टँकर अडवून दूध ओतून दिले अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दूध केंद्रावर न देता गरिबांना मोफत दिले. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील दूध वाहतूक देखील रोखली. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. शेट्टी म्हणाले की निर्यातीला अनुदान द्या, आयात पूर्णपणे बंद करा, वस्तू सेवा कर रद्द करा, शेतकर्‍याला थेट अनुदान द्या या आंदोलनाच्या चारपैकी तीन मागण्यांचा फायदा दूध संघांना आहे. जर दूधसंघांना फायदा झाला तर शेतकर्‍यांना होईल. मात्र आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या