वेरूळ लेणीसमोरील कीर्तिस्तंभ 'जैसे थे'च राहणार!

चंद्रकांत खैरे यांची मध्यस्थी
वेरूळ लेणीसमोरील कीर्तिस्तंभ 'जैसे थे'च राहणार!

औरंगाबाद - aurangabad

वेरूळ लेणी (Ellora Caves) समोरील जैन कीर्तिस्तंभ भगवान महावीराने (Lord Mahavira) सांगीतलेल्या सत्य, अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचे तत्वज्ञान सांगतो. ही शिकवण कोणा एका धर्माची नसून समस्त समाजासाठीची आहे. पुरातत्व खात्याने कीर्तिस्तंभ "जैसे थे' ठेऊन सौंदर्यीकरण करण्याची मागणी समाजातील सदस्यांनी केली. तर स्तंभ पाडणार नसून तो हलविणार असल्याचा पुनरोच्चार पुरातत्व खात्याने केला. त्यासाठी वेरूळमध्ये अन्यत्र योग्य जागा शोधण्याचा सल्ला, पुरातत्व खात्याने दिला. याबाबत लवकरच (Divisional Commissioner) विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीत तोडगा काढण्यावर दोन्ही बाजूचे एकमत झाले.

वेरूळला बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेणी असतांना केवळ एकाच धर्माचे प्रतिक असणारा जैन कीर्तिस्तंभ स्थलांतरीत करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व खात्याने घेतला आहे. भगवान महावीर यांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त ४८ वर्षांपूर्वी स्तंभ उभारण्यात आला होता. वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरूकूलसह जैन समाजातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्व खात्याचे अधिक्षण पुरातत्वविद् डॉ. मिलनकुमार चावले यांची भेट घेऊन चर्चा केली.

सरकारनेच बसविला स्तंभ

भगवान महावीराच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त १९७४ मध्ये देशभरात जैन कीर्तिस्तंभ उभारण्यात आले होते. त्यासाठी केंद्राच्या सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. तत्कालीन आयुक्त बी.के. चौघुले यांनी वेरूळ, कन्नड आणि बाबा पेट्रोल पंप येथे स्तंभाला मंजूरी दिली. सकल जैन समाजाच्या सहकार्याने तो उभारण्यात आला. दरवर्षी महावीर जयंतीनिमीत्त येथे ध्वजारोहन, मिरवणूक आणि सदभावाना कार्यक्रम होतात. ४८ वर्षानंतर सरकाराने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन स्तंभ काढणे चूकीचे आहे. यामुळे कोणाच्या धर्माचा प्रचार किंवा जागेवर अतिक्रमण झाले नसल्याने तो आहे त्याच ठिकाणी ठेऊन सौंदर्यीकरणाचे काम करावे.

- वर्धमान पांडे (Vardhman Pandey) , अध्यक्ष, श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरूकूल

कीर्तिस्तंभ हलवू देणार नाही

भारत सरकारने तीन ठिकाणी स्तंभ बसविण्याचा निर्णय घेतला होता. कन्नडला जागा मिळत नव्हती. आम्ही स्वत: भांडून जागा निश्चित केली. वेरूळचा स्तंभ सर्वात आधी उभा राहिला. तो पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पर्यटक येथे फोटो काढतात. काही लोकं येथे दारू पिऊन गोंधळ करतात. वाहने धडकवितात. स्तंभाजवळ वस्तू विकण्यासाठी गर्दी करतात, याचा पर्यटकांना त्रास होतो. हा त्रास थांबविणे गरजेचे आहे. आता हा रस्ताच बंद होणार आहे. येथून वाहनांची वर्दळ कमी होईल. यामुळे स्तंभाचा वाहतूकीसाठी अडथळ्याचा प्रश्नच राहणार नाही. यामुळे स्तंभ हलवू नये, अशी मागणी पुरातत्व खात्याकडे केली आहे. कोणत्याही परिस्थितीत तो हलवू देणार नाही.

- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते (Chandrakant Khaire, Shiv Sena leader)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com