संपूर्ण मराठवाडा चिंब!

संततधार पावसाने दिलासा 
संपूर्ण मराठवाडा चिंब!

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाला Torrential rain सुरुवात झाली आहे. विभागात २४ तासात ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर ८५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड व जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. निम्न दुधना धरणाच्या nimna Dudhna Dam चौदा दरवाज्यातून सोमवारी दुपारी विसर्ग सुरू आहे.

मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवार सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. विभागात रविवारी देखील सर्वदूर पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात रविवारी सकाळी नऊपर्यंत ४१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६९.७ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद (४२), जालना (६१.७), लातूर (४६), उस्मानाबाद (५०.६), नांदेड (१८.१), परभणी (१४.८) आणि हिंगोली (४०.७) अशी जिल्हानिहाय पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील करमाड (७७.७५), आडूळ (७३), पिंपळवाडी (९६.२५), बालानगर (६९.७५), नांदर (१०६.२५), पाचोड (१२४.५०), विहामांडवा (११८.२५), कन्नड (७३.२५), अजिंठा (१३३.५०), अंभई ९८०.७५) आणि सोयगाव (११५.५०) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जालना जिल्ह्यातील १६ मंडळात, बीड जिल्ह्यात ३२, लातूर दहा, उस्मानाबाद १२ आणि नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील मादळमोही (ता. गेवराई) मंडळात सर्वाधिक १७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनी खरवडल्या गेल्या आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. सेलू (जि. परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

धरणाच्या चौदा दरवाज्यातून रविवारी दुपारी ३० हजार २६८ क्यूसेक दराने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारी सायंकाळीही पाऊस झाला. निम्न दुधना धरणाच्या nimna Dudhna Dam लाभक्षेत्रातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सेलू- देवगाव फाटा रस्त्यावर मोरगावजवळील दुधना नदीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणात पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी धरणात ४४.८१ टक्के पाणीसाठा आहे. निम्न दुधना, सिद्धेश्वर धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे. मानार धरण भरले असून माजलगाव, मांजरा, येलदरी, विष्णुपुरी धरणात पाणीसाठा वाढत आहे.

शहरात संततधार

औरंगाबाद शहरात सोमवारी रात्री संततधार पाऊस झाला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत १९.६ मिलिमीटर नोंद झाली. शहरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com