कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी 'मनोमित्र कक्ष'

मानसिक आधार दिला जाणार
कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी 'मनोमित्र कक्ष'

औरंगाबाद - Aurangabad

अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांत उपचार घेत असताना नैराश्य, भीती, अतिविचार, तणाव येतो. यातून त्यांच्यात मोठा भावकल्होळ निर्माण होतो. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णात आत्मविश्‍वास असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने आता अशा कोरोना रुग्णांना व्यक्‍त होण्यासाठी तसेच भावनिक आधार देण्यासाठी पालिकेत मनोमित्र समुपदेशन कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकाराने हा कक्ष बुधवारपासून औरंगाबादकरांच्या सेवेत कार्यरत होत आहे. या कक्षाच्या समन्वयक म्हणून डॉ. कल्पना मोटे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. या मनोमित्र समुपदेशन कक्षाचा संपर्क क्रमांक-7030912109 असा आहे. सायकोलॉजीस्ट सोसायटी महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संदीप शिसोदे, पंख फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. मधुरा अन्वीकर, माजी नगरसेविका अ‍ॅड. माधुरी अदवंत या सर्वांच्या पुढाकाराने या समुपदेशन कक्षासाठी पालिकेला 25 ते 30 समुपदेशकांची यादी प्राप्‍त झाली आहे. हे सर्व समुपदेशक संबंधित क्रमांकावर कॉल करणार्‍या कोरोना रुग्णांना मोफत समुपदेशन करतील. कोरोना रुग्णांना पॉझिटिव्ह आल्यानंतर एक महिन्यापर्यंत समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

गरजू रुग्णांनी मनोमित्र समुपदेशन कक्षाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास त्यानुसार त्यांना मार्गदर्शन व सल्ला देऊन मानसिक आधार दिला जाईल. संबंधित हेल्पलाइन क्रमांक सर्व सरकारी व खागसी रुग्णालये, पालिका कोविड सेंटर्समध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हा कक्ष सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बारा तास कार्यरत राहील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com