औरंगाबादमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकन गुणियाचे थैमान

jalgaon-digital
3 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

शहरात कोरोना (corona) संसर्गाची साथ आटोक्यात येत असतानाच आता वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुणिया, कावीळ (Malaria, dengue, jaundice) साथीने थैमान घातले आहे. दररोज लहान बालकांपासून वयोवृध्दापर्यंत सर्वजण साथीच्या विळख्यात सापडले जात आहे. घराघरात या आजारासह तापाचे रुग्ण आढळून येत आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णांची (Private hospital) गर्दी वाढली असून नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यातच पावसामुळे डासांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे ऐन गणपती व महालक्ष्मी या सणासुदीच्या काळात शहरात साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. मागील आठ दिवसापासून मलेरिया, डेंग्यू, काविळ, चिकन गुणियाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खासगी रुग्णालयासह छोट्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे.

अतिवृष्टीसह दररोज कोसळणार्‍या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला व मोकळया जागा, घराचा परिसर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होवून डासांचा उपद्रव वाढला आहे. तसेच घराच्या गच्चीवर वापरासाठी टाक्या व हौदामध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती असल्याने डेंग्यूची साथ देखील जोरात सुरू आहे. अगोदर ताप येत असून त्यातच अचानक प्लेटलेट कमी होत आहे. हातापायाचे सांधे दुखत असल्याने चिकुन गुणियाची साथ पसरली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे काविळचे रुग्ण देखील मोठ्या संख्येने आढळून येत आहे.

शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुणिया, काविळ या साथीचे आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. दररोज साधारणपणे साथीच्या आजाराचे दीड ते दोन हजार रुग्ण तपासणीसाठी खासगी रुग्णालये, दवाखान्यात जात आहे. बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची साथ असून बाल रुग्णालयात देखील बालकांची गर्दी होत आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असले तरी त्यांची कोरोना चाचणी करण्याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुणिया, कावीळ साथीने रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जम्बो फवारणी व अबेटिंगची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, मलेरिया विभागाचे सर्व कर्मचारी एकत्रित करून प्रभागांमधील प्रत्येक घरात 15 सप्टेंबरपासून औषध फवारणी, अबेटिंग, गप्पी मासे सोडणे, साचलेल्या पाण्यात ऑईल टाकणे ही जम्बो मोहीम राबविण्यात येणार आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालय व दवाखान्यांना पत्र देऊन तापाच्या रुग्णांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र खासगी रुग्णालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना पत्र देऊन तापेच्या रुग्णांची सक्तीने कोरोना चाचणीचे आवाहन केले ले असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *