सायरस पुनावाला म्हणतात लशीच्या आकड्यांबाबत राजकारणी थापाडे

सायरस पुनावाला म्हणतात लशीच्या आकड्यांबाबत राजकारणी थापाडे

पुणे |प्रतिनिधी| Pune

आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही असे स्पष्ट करत लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहे असे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला म्हणाले. दरम्यान, मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांवर दोषारोप होईल असेही त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोव्हिशिल्ड ही कोरोनाची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला . माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.

पूनावाला म्हणाले, जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही. पण आम्ही अॅडव्हान्समध्ये प्रयत्न करून आणि हजारो कोटींची गुंतवणूक करून हे केलं आहे. म्हणून 110 किंवा 120 पर्यंत आम्ही दरवर्षी लसी देऊ. त्या प्रमाणे तुम्हाला कॅलक्यूलेट करावं लागेल. तसेच बाकीचे उत्पादक महिन्याला एक किंवा दोन कोटी लसी देतील. तर त्याप्रमाणे इम्यूनायझेशन वाढेल. यावरून राजकारणी किती लोकांना व्हॅक्सिन देऊ शकतात आणि किती थापा मारतात याचा विचार तुम्हीच करा.

लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट करताना ते म्हणाले, लॉकडाऊन नसावा. एकदाच किड जाईल आणि लोकांना हर्ड इम्युनिटी मिळेल. खूप मृत्यू होत असतील तर लॉकाडाऊन उत्तम आहे. पण लो रेट असताना आवश्यकता नाही. 50 ते 60 टक्के लोकांचा मृत्यू निष्काळजीपणाने झाला. कोणी दवाखान्यात वेळेवर गेले नाहीत, कुणाकडे उपचारासाठी पैसे नव्हते तर काही लोक देवाच्या भरवश्यावर राहिले. विविध कम्युनिटीच्या लोकांनी तर सुरुवातीला उपचार नाकारले आणि व्हॅक्सिनही नाकारली. पण आजाराचा प्रकोप वाढल्यानंतर ते रुग्णालयात आले. त्यामुळे उशिर झाला होता. दवाखान्यात तात्काळ येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होतं, असं त्यांनी सांगितलं.राज्यातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि व्हॅक्सिनची मागणी कमी झाली तर मला काही फरक पडणार नाही. मला लोकांच्या दु:खातून पैसा जमवायचा नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पण मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नाही

सर्वाधिक करोना रुग्ण पुण्यामध्ये असल्याचे अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. पण त्यावर केंद्रातील मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नसल्याचे सायरस पूनावाला यावेळी म्हणाले.

नोकरशाहचा पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना खूप जाच व्हायचा, आता कमी झाला असून याचे श्रेय मोदी सरकारला असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे. सीरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. पण आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोव्हिशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. आम्ही ही लस अतिशय माफक दरात देत असल्याचेही यावेळी पूनावाला यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या एवढ्या नाममात्र किमतीत दिल्या असल्याचेही पूनावाला म्हणाले.

कॉकटेल लस नकोच

मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांवर दोषारोप होईल. सीरम म्हणेल त्यांची लस चांगली नाही. तर समोरची कंपनी म्हणेल सीरमच्या लसीमुळे गडबड झाली. त्यामुळे एकमेकांवर आरोप होण्यापलिकडे दुसरं काही होणार नाही, असं ते म्हणाले.

वर्षे अखेरीपर्यंत भारताचं व्हॅक्सिनेशन पूर्ण होईल का? आणि 45 कोटी डोस येतील का/ या प्रश्नावर बोलताना ते महाणले, सर्वांची अपेक्षा आहे. आपल्याला लस मिळायला हवी. पण ते वाटतं तितकं सोपं नाही. आमच्या 20 लसींचं महिन्याचं उत्पादन 10 कोटी होतं. पण आता आम्ही या एका लसीचं 10 कोटी उत्पादन करतो. त्यामुळे बाकीच्या लसींचं उत्पादन थोडं मागे पडलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com