ई-पास बंद होणार नाही

...तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता
ई-पास
ई-पास

नागपूर | Nagpur -

राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा स्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते. Vijay Wadettiwar

ते म्हणाले, केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्या तरी ई-पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात करोना रुग्णवाढीमुळे काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

दरम्यान, एसटी बसमधून ई-पासविना प्रवासाची मुभा असताना खासगी वाहनांना मात्र हा पास बंधनकारक आहे. त्यामुळे टीकेला सामोरे जाणार्‍या सरकारने ई-पासच्या धोरणाबाबत फेरविचार सुरू केला होता. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यामुळे यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आंतरजिल्हा एसटी बस सेवेला परवानगी देताना, त्यातून प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही, असं सरकारने जाहीर केलं. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे एसटी बस आणि खासगी वाहनांतून प्रवास करणार्‍यांना वेगवेगळा न्याय का, असा सवाल करण्यात येऊ लागला. सरकारच्या या धोरणावर समाजमाध्यमांवर टीका सुरू झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com