अभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप
महाराष्ट्र

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेंच्या उपस्थितीत आज ‘युवारंग’चा समारोप

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

 येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचा उद्या दि. 20 रोजी समारोप करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे बक्षिस वितरण प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

आनंदयात्री  पु.ल.देशपांडे रंगमंच क्र.1 वर सकाळी 10 वाजता पारितोषिक वितरण आणि समारोप होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.वारकरी दिंडी, गोंधळ, आदिवासी नृत्य ते थेट अभिजात शास्त्रीय नृत्याच्या अविष्काराने युवारंग युवक महोत्सवाचा चौथा दिवस नृत्यमय झाला.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या चौथ्या दिवसी पाच रंगमंचावर सकाळी विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा सुरु झाल्या. आनंदयात्री पु.ल.देशपांडे रंगमंच क्र.1 वर सकाळी समुह लोकनृत्य स्पर्धा झाली. या मंचावर रसिकांची सर्वाधिक गर्दी झाली. खादी पताका घेऊन निघालेली वारकरी दिंडी, आंबाबाईचा गोंधळ, घुमर नृत्य, आदिवासींच्या डोंगरातील देवाला प्रार्थना करणारे नृत्य, कोळीनृत्य, देव्हारी नृत्य, कातकरी नृत्य असा सामुहिक नृत्याचा अविष्कार दाखवितांना या कलावंतांनी रसिकांच्या प्रचंड टाळ्या मिळविल्या. संगीत, वेशभुषा यासोबतच विविध साधनांचा अत्यंत कलात्मकतेने केलेला वापर यामुळे प्रत्येक नृत्याने लक्ष खिळवून ठेवले.

गायक-सुधीर फडके रंगमंच क्र.2 वर शास्त्रीय नृत्य स्पर्धा झाली. यामध्ये 9 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पदन्यास, हस्तमुद्रा, नेत्राविष्कार यासोबतच अभिनय याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या शास्त्रीय नृत्यात विविध रसभावांची अभिव्यक्ती केली. वेशभुषा, केशभुषा, रंगभुषा यामुळे प्रत्येक स्पर्धक लक्षवेधून घेत होता. कथ्थक, भरतनाट्यम् आदी नृत्यांचे सादरीकरण झाले.दुपारी याच मंचावर लोकसंगीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत विविध वाद्यांचा वापर करत स्पर्धकांनी गोंधळ, लावणी, आदिवासी, मिरवणूक आदी प्रकार सादर करुन लोकसंगीताच्या समृध्द परंपरेला या मंचावर उजाळा दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच क्र.3 वर सकाळी 9 वाजता वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी भारतीय संविधान: मानवतेचा जाहीरनामा असा विषय देण्यात आला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपली मांडणी करतांना समता, बंधुता हा संविधानाचा पाया असून या संविधानामुळेच आपल्याला मत मांडण्याचा अधिकार मिळालेला आहे. याशिवाय धार्मिक स्वातंत्र्य अबाधित आहे, असे स्पर्धक मत मांडतांना दिसून आले. संविधानामुळे देशात एकता आणि विविधता टिकून आहे. पूर्वी होणार्‍या अत्याचाराला पायबंद बसला आणि स्त्री-पुरुष समानता, अभिव्यक्ती, मतदान आदी स्वातंत्र्य प्राप्त झाले. संविधानातून माणूसकीचा संदेश देण्यात आला आहे. जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत माणुसकी जीवंत राहील असे मत व्यक्त करतांना स्पर्धकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

गीतकार  ग.दि.माडगुळकर रंगमंच क्र. 4 वर सकाळी फोटोग्राफी स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 50पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी महोत्सव परिसरातील छायाचित्रे टिपली. त्यातून 10 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल रंगमंच क्र.5 वर सकाळी चित्रकला स्पर्धा झाली. पर्यावरण, श्रमप्रतिष्ठा आणि स्त्री-पुरुष समानता हे विषय देण्यात आले. दुपारी इनस्टॉलेशन या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या परिसरातील वापरात नसलेल्या काही वस्तुंपासून विद्यार्थ्यांनी कलात्मक मांडणी करतांना सामाजिक संदेश दिली. मेहंदी स्पर्धेत चुरस दिसून आली. सोबतच्या सहारी मैत्रिणीच्या हातावर मेहंदी काढतांना स्पर्धक तल्लीन झाले होते. रविवारी सहभागी कलावंताचा उत्साह वाढविण्यासाठी महोत्सव परिसरात अनेकांनी भेटी दिल्या. आ.विजयकुमार गावीत, महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील, पूज्य साने गुरुजीविद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन सोसा.चे जितेंद्र पाटील,डॉ.कांतीलाल टाटीया, प्राचार्य सुर्यवंशी, प्राचार्य उदय कुलकर्णी, श्रीकांत वडोदकर, रणजीत राजपूत, ईश्वर पाटील, सुनील पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा समावेश होता. रंगमंचाना ज्या मान्यवर व्यक्तींची नावे दिली आहेत. त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती देणारे फलक प्रत्येक मंचाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com