Sero report
Sero report|करोनाशी लढण्यात महिला अधिक सक्षम
महाराष्ट्र

करोनाशी लढण्यात महिला अधिक सक्षम

सेरो अहवालातील निष्कर्ष!

Kishor Apte

मुंबई | Mumbai |प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सीरो सर्वेक्षणानुसार तीन प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोनावर मात करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील ५९.३ टक्के महिलांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत कोरोना संसर्गाचा विचार केल्यास महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात संसर्ग झाला असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उच्चपदस्थ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सेरो सर्व्हेत एकूण नमुन्यांपैकी २ हजार २९७ म्हणजे ५९.३ टक्के महिलांमध्ये कोरोना (अँटिबॉडी) प्रतिकारक्षमता असल्याचे आढळून आले. त्या तुलनेत पुरुषांमध्ये फक्त १ हजार ९३७ म्हणजे ५३.२ टक्के कोरोना अँटिबॉडी तयार झाल्याचे स्पष्ट झाले.

पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटिबॉडिज अधिक प्रमाणात विकसित झाल्या आहेत. ही महिलांसाठी काहिशी दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते अनेक देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सारखे आढळून आले आहे.

मुंबईत मात्र पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या कमी आहे. मुंबईत ४५ टक्के महिला कोरोनाबाधित आहेत. तर ५५ टक्के पुरुषांना कोरोना संसर्ग झाला आहे. महिलांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. झोपडपट्ट्यांमधील महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या सर्वक्षणात समोर आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com