हिवाळी अधिवेशन दोनच दिवसांचे

उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक
हिवाळी अधिवेशन दोनच दिवसांचे

मुंबई -

करोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात उद्या गुरूवारी होणार्‍या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असला तरी हे अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी दोन दिवसांचे घेतले जाण्याची शक्यता शक्यता आहे.

दरवर्षी नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत घेण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.गेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन मुंबईत घेण्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सहमती दर्शवली होती. नागपूर येथे अधिवेशन घेतल्यास संपूर्ण शासकीय लवाजमा, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तेथे जावे लागेल. या निमित्ताने विविध मतदारसंघातील आमदारही तेथे येत असल्याने या सर्वांची निवास व्यवस्था करणे अशक्य आहे.नागपूर येथील आमदार निवासस्थानाचा वापर क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आल्याने या ठिकाणी आमदारांची निवास व्यवस्था करणे अशक्य आहे. विधानभवन आमदार निवास आणि शासकीय निवासस्थान मध्ये आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने अखेर नागपूरऐवजी मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्यावर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्या ऐवजी हे अधिवेशन आता दोनच दिवसांचे होण्याची शक्यता आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com