कलाकारांना सर्वतोपरी मदत करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
कलाकारांना सर्वतोपरी मदत करणार

मुंबई । प्रतिनिधी

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून, कलाकारांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी दिली.

यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत,अशा सूचनाही देशमुख यांनी आज दिल्या. अमित देशमुख यांनी आज सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या, दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कलावंतांच्या प्रश्नावर चर्चा झाली.

कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे आणि अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल. अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या.

याकाळात नाट्य, चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. तसेच अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही देशमुख म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com