
मुंबई | Mumbai
देशभरात उशीरा दाखल झालेल्या पावसाने आता मात्र अनेक राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काल उत्तर कोकणच्या काही भागांत निर्जन ठिकाणीही अतिवृष्टी झाली. रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलेला पहायला मिळाली. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या एलबीएस मार्गावरील वाहतुकही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली पहायला मिळाली. वाहतुक मंदावलेली असल्याने कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. तसेच मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे, तर मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने 15 ते 20 मिनिटं उशिराने आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 15 मिनिटं उशिराने धावत आहे. दरम्यान, एकीकडे राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसतोयं तर दुसरकीडे राज्यातील इतर भागांत अद्यापही पावसाची वाट पहावी लागत असल्याची परिस्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागली आहे.