
मुंबई | Mumbai
राज्यात दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस पाठ सोडत नव्हता तर आता काही दिवस झाले असतील राज्यात उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. यादरम्यान मान्सुनची वाट पाहिली जात आहे.
यादरम्यान यंदाच्या मान्सून आगमनाची तारीख समोर आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख (वेस्टर्न इंडिया) आणि शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी एका वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन आणि त्याच्या वाटचालीबद्दल माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की, या वर्षी एप्रिलमध्ये जारी केलेल्या हवामानाच्या दिर्घकालीन अंदाज म्हणजेच LRF (Long Range Forecast) नुसार महाराष्ट्रात ९६ % पर्यंत सामान्य मान्सून राहाणार आहे. याचा अर्थ असा की राज्यात सरासरी ८७ मिमी पाऊस पडेल.
तसेच त्यांनी सांगितलं की, सध्याच्या LRF नुसार १० आणि ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल. तर मान्सून कसा प्रवास करेल आणि तो उत्तरेकडे केव्हा आणि कसा सरकेल, हे या महिन्याच्या अखेरीस कळेल असेही त्यांनी सांगितलं.
यापूर्वीचा अंदाज काय होता?
यापूर्वीचा अंदाजानुसारही यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे ९६ टक्के दाखवण्यात आला होता. आयएमडीने १९५१ ते २०२२ या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. जर देशात ९० ते ९५ टक्के पाऊस झाला तर तो सामान्यपेक्षा कमी समजला जातो. ९६ ते १०४ टक्के हा सामान्य पाऊस आहे. जर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर जास्त पाऊस असतो. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो.
पुढील अंदाज केव्हा
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडीचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल नीनोच्या परिणामासंदर्भात बोलता येणार आहे. अल नीनो असणार आहे, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. परंतु आजवर १५ वेळा अल नीनो सक्रिय असताना मान्सून ६ वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल नीनो चा मान्सूनशी ४० % संबध गृहीत धरला जातो.
पुढील २४ तासांत कसं असेल हवामान?
महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात (Mumbai, Konkan) उकाडा वाढत असताना राज्याचा उर्वरित भागही याला अपवाद ठरलेला नाही. त्यातच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या अती उकाड्यामुळंच एखादी अवकाळीची सरही बरसू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशातील हवामानातही पुढील २४ तासांच काही अंशी बदल नोंदवले जाऊ शकतात. ज्यामध्ये पूर्वोत्तर भारतात हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. केरळ, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील.
तर, दिल्ली आणि राजस्थानमध्ये धुळीचं वादळ येऊ शकतं. उत्तराखंड आणि हिमाचलच्या पर्वतीय भागामध्ये बर्फवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेऊन पुढील बेत आखण्याचं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.