
मुंबई | Mumbai
देशासह राज्यात उन्हाची चाहूल लागली आहे. याच दरम्यान राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार तळ कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील कराही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे कोकणात अंबा, फणस, काजू आदी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात द्राक्ष, संत्र आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नागपुरात आज सकाळी पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार ३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यात तुरळक पाऊस झाला. ग्रामीण भागापेक्षा नागपूर शहरात अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून तापमानही खालावले आहे. सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार नागपुरात ३६.८ तापमानाची नोंद झाली आहे.