
वर्धा | Wardha
वाढदिवस (Birthday) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. कोणी खास केक कापून वाढदिवस साजरा करतं तर कोणी वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन करतं. असंच सेलिब्रेशन एका तरुणाला चांगलं महागात पडलं आहे.
वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली. वर्ध्याच्या सिंधी मेघे येथील ही घटना आहे. रितीक वानखेडे असं या बर्थडे बॉयचं नाव आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारला, याचवेळी फायन गनमधून निघालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत रितीकच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
दरम्यान, लग्न किंवा कोणत्याही पार्टीच्या प्रसंगी असे स्प्रे वापरताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. याचा वापर करताना सावधगिरी बाळगली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकारचे स्प्रे वापरताना, लक्षात ठेवा की आजूबाजूला कुठेही आगीचा स्त्रोत नाही. जवळपास कुठेतरी आग लागल्यास अशा प्रकारचे स्प्रे वापरणे टाळा. डोळा हा संवेदनशील अवयव असल्याने अशा प्रकारच्या स्प्रेची फवारणी एखाद्याच्या डोळ्यात करू नये.