उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने रसिक मंत्रमुग्ध

उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे | Pune

ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली यांनी सरोदवर छेडलेला 'शुद्धकल्याण' आणि 'दरबारी' राग त्याचबरोबर स्वरांच्या साथीने शब्दांतूनही रसिकांशी साधलेला संवाद 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या'च्या पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धाचे वैशिष्ट्य ठरला.

६८ व्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात  संगीत मार्तंड पं. जसराज यांचे शिष्य व भाचे रतन मोहन शर्मा यांनी गायन सादर केले. सूर्याची उपासना असणाऱ्या गायत्री मंत्राने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर राग गोरख कल्याणमध्ये 'तुमरो संग मोहन मोरी प्रीत लाग रही' ही विलंबित बंदिश तर द्रुत त्रितालात 'नेक कृपा कर आयी रे' बंदिश आणि तराणा सादर केला. रसिकाग्रहास्तव त्यांनी हवेली संगीत प्रकारातील रचनाही सादर केली. 'ओम नमो भगवते वासुदेवाय:' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.

त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम), अजिंक्य जोशी (तबला), सुखद मुंडे ( पखावज),वैदेही अवधानी व भाग्यश्री कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यांनतर पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वर भीमसेन २०२३’ या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकेचे विश्वविख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांच्या हस्ते व आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

यंदा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे त्या निमित्ताने भीमसेनजींच्या विविध भावमुद्रा निवडून संगणकाच्या सहाय्याने त्यावर चित्र-संस्कार करीत ज्या मुद्रा तयार झाल्या त्या चित्रांचा वापर करूनच या वर्षीच्या दिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या चित्रांच्या सोबतच ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांच्या लेखणीतून साकारलेले भीमसेनजींचे ‘शब्द-शिल्प’त्यांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवतात.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशीचा समारोप उस्ताद अमजद अली खाँ यांच्या बहारदार सरोदवादनाने झाला. त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग शुद्धकल्याणद्वारे केली. त्यांनतर गणेश कल्याण ही एकतालातील रचना सादर केली. राग दरबारी सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर खमाज रागात 'एकला चलो रे' या रचनेच्या सादरीकरणाद्वारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.

त्यांना अमित कवठेकर आणि अनुप्रत चॅटर्जी  यांनी तबल्यासाठी साथ केली. भीमसेन जोशी हे मला गुरुभाई म्हणत, आमच्या दोघांचेही नाते हे स्वर लयींचे नाते होते. त्यामुळे ते रक्तापेक्षाही घनिष्ठ होते. पुण्यात आल्यावर प्रत्येक वेळी मला त्यांची आठवण येते. असे म्हणत अमजद अली खाँ पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांनी राग मारवा व पुरिया यांमधला फरक स्वत: पंडित भीमसेन जोशी यांना सांगितला होता. आज मी राग दरबारी सादर करत आहे. आजचा हा दरबार अकबराचा नाही, तर पंडित भीमसेन जोशी यांचा दरबार आहे.”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com