महाराष्ट्र

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य - उदय सामंत

करोनाचा संभाव्य धोका पाहता राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य असून,विद्यापीठ अनुदान आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टहास असला तरी करोनाचा संभाव्य धोका पाहता राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला सूचना करून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली.

राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे मत या बैठकीत मांडले गेले. समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या दोन महिन्यात घेणे अशक्य असल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परीक्षा घेण्याचा अट्टहास असला तरीही राज्यात असणारा करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे उदभवणारा संभाव्य धोका पाहता राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील करोना परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असले तरीही परीक्षा घेऊच शकत नाही असा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याचेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. बंगळुरुमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली त्यामधील निम्मे विद्यार्थी हे करोना बाधित झाले. राज्यात अशा संकटात परीक्षा घेतली आणि विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली तर याची जबाबदारी विद्यापीठ अनुदान आयोग घेणार का, असा सवालही सामंत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच वाईन शॉप आणि विद्यापीठांची तुलना योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. एटीकेटीबाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात परीक्षा घेण्यास विद्यार्थी आणि पालकांचा विरोध आहे. राज्यातील प्राध्यापकही परीक्षा घेण्यास तयार नाहीत असे सांगतानाच राज्यातील करोनाचे संकच गेल्यानंतर परीक्षा घेण्यास सरकार तयार आहे असेही सामंतांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना अभ्यास करु नका,असा सल्ला कोणीही दिला नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहे. माणूस हा शेवटपर्यंत शिकतच असतो.परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अभ्यास बंद करा, असा सल्ला मी देणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच हवा, असेही सामंत यांनी सांगितले. मुंबई, पुणे आदी ठिकाणची महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे रुपांतर करोना रुग्णालयांमध्ये करण्यात आले आहेत. काही महाविद्यालये क्वारंटाईन सेंटरसाठी दिले आहेत. राज्यात 12 हजार कंटेन्मेंट झोन असून, यामध्ये 1 कोटी लोक आहेत, मग अशा परिस्थितीत येथे विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला.आरोग्याची असुविधा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून या परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत. राज्यातील करोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे आधीच्याच निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे असे सामंत यांनी सागितले.

Deshdoot
www.deshdoot.com