
पुणे | Pune
उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक साऱ्यांना पाण्यात मनसोक्त भिजावेसे वाटते. उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंश डिग्री सेल्सीअसपर्यंत गेलाय. उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते. दरम्यान धरणात पोहणे दोन मुलींच्या जिवानीशी आले.
खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी ९ मुली उतरल्या होत्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या मुली पाण्यामध्ये उतरल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. धरणाच्या काठाजवळ दशक्रिया विधीसाठी आलेल्या काहींना या मुली बुडत असल्याचे दिसले.
त्यानंतर या लोकांनी धरणामध्ये उडी मारत ९ पैकी ७ मुलींना सुखरुप बाहेर काढले. तर दोन मुलींचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. या सर्व मुलींचे अंदाजे वय १६ ते १७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. धरणामध्ये बुडालेल्या दोन मुलींचे मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे.
चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा (२६), प्रफुल विठ्ठल येलुरे (२०), शुभम रुपचंद लांजेवार (२४), महेश मधुकर घोंगडे (२०) सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.