करोना चाचणीचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट करून देणारे दोघे जेरबंद

करोना चाचणीचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट करून देणारे दोघे जेरबंद

दोनजन फरार

पुणे(प्रतिनिधि)

पुण्यातून इतर राज्यात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असला तरच या प्रवाशांना परराज्यात जाता येणार आहे. दुसऱ्या राज्यातही हा रिपोर्ट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

मात्र, याचा गैरफायदा घेत परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांत करोना चाचणीचा बनावट रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ करोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. दोन जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय २५, धनकवडी, पुणे), पत्ताराम केसारामजी देवासी (वय ३३, रा. वाकड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिरंजीव (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॅान्स्टेबल कुणाल दिलीप शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे ५०० ते ६०० रुपये घेऊन करोनाचा रिपोर्ट देत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ५०० रुपये देऊन एका इसमाला रिपोर्ट घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्याच्या व्हाटसअपवर करोना निगेटिव रिपोर्टची फाईल होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी वैष्णव व देवासी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी मोबाइलमधील व्हाटसअपवर करोना निगेटिव रिपोर्टच्या काही पीडीएफ फाईल मिळून आल्या. आरोपी राजू भााटी आणि चिरंजीव यांनी हे रिपोर्ट बनवून दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. बावधन येथील लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल यांच्या नावाचे हे रिपोर्ट असल्याने पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता कोरोनाचे ते रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी वैष्णव व देवासी यांना अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com