सोलापूर -

सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकाला अडवण्याचा प्रयत्न करणार्या वाहतूक पोलिसाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात

पोलीस सागर चोबे (वय 33) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलवणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने टेम्पो घातला. यामध्ये वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक नवनाथ बिबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, टेम्पो चालकावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगताना पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशन काळात यासंदर्भात आपण एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहोत. विशेषतः महामार्गावरील वाहतूक पोलिसांना आणि संबंधित सर्वच यंत्रणांबाबत या बैठकीत एकत्रीत चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

चालक बेदरकारपणे महामार्गावर वाहनं चालवतात, यासाठी आत्ताच्या नियमांपेक्षा अधिक कडक नियम करणं आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पहिल्यांदा, दुसर्यांदा मोडल्यास शिक्षा होते पण वारंवार जर हे झालं तर त्याचं लायसन्स रद्द करणं गरजेचं असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले.