मुंबई । प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस प्रमुख म्हणून परमबीर सिंग यांच्या कार्यालयातून तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत अक्षम्य चुका झाल्या. त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळे सिंग यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. परमबीर सिंग यांची बदली नेहमीची नव्हती, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

एका वृत्तपत्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी सिंग यांच्या बदलीच्या निर्णयावर भाष्य केले. स्फोटकांप्रकरणी एनआयए आणि एटीएसमार्फत तपास सुरु असून त्यांच्या माध्यमातून काही माहिती समोर आली. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि आम्ही बसून सिंग यांच्या बदलीचा निर्णय घेतला, असे देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची जगात ख्याती आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी चुका केल्या. तपासात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. स्फोटकांचा मुद्दा येतो तिथे एनआयए तपास करतेच. या प्रकरणात जो कोणी दोषी असतील त्यांना तपास यंत्रणा शोधून काढतीलच, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

सचिन वाझे यांना सेवेत परत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवेत आणण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती आहे. ती समिती त्याचा निर्णय घेते. त्यानुसार सचिन वाझे पोलीस दलात परतले. देवेंद्र फडणवीस यांचा आरोप राजकीय आहे. त्यांनाही माहित आहे की अशा फाईल्स सरकारकडे येत नाहीत, समितीकडे ही फाईल येते. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवेत परत घेण्याचा अधिकार आयुक्त स्तरावरील समितीला आहे.