
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
निफाड (Niphad) शहराच्या जुन्या निफाड गावठाण बाहेर अनेक प्लॉट पडल्याने विकास झाला आहे. आता निफाड शहराच्या जुन्या गावाचा विकास व्हावा, यासाठी काही ज्येष्ठ व अनुभवी नागरिकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या गावातील जागांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहे. त्यात भाऊबंदकी, आर्थिक अडचणी (Financial difficulties) व न्यायालयीन वाद (Court disputes) अशा प्रश्नांची सोडवणूक करून त्या जागेवरील रहिवाशांना नवीन इमारती बांधून घराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यासाठी 11 नागरिकांची एक समिती स्थापन होईल. या समितीत 2 वकील व 2 बांधकाम व्यवसायातील अनुभवी, 2 इंजिनिअर व इतर 6 व्यक्ती असाव्या, अशी कल्पना पुढे आली आहे.
या समितीतील वकिलांना नाममात्र फी देण्यात येईल. इंजिनियर (engineer) यांनी आपली कमीत कमी फी घ्यावी, अपेक्षा राहणार आहे. ज्या व्यक्तींना या समितीत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) कळविले तरी चालेल,असे आवाहन निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार (Rajaram Shelar) यांनी केले आहे. निफाड शहरात जुन्या जीर्ण तसेच डागडुगी लायक किमान चारशे इमारती आहेत. यापेक्षा किमान 40 इमारतीचा विकास आपण एक वर्षात केला तर किमान 400 ते 500 सदनिका तयार होतील.
निफाड (niphad) शहराचे स्वरूप या जुन्या इमारतीमुळे अस्वच्छ व नियोजन शून्य वाटत आहे. काही ठिकाणी या नवीन बांधकामामुळे रस्ते व पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. माझी ही कल्पना काहींना चेष्टा वाटेल किंवा टीका करण्यासाठी एक भांडवल मिळेल. याचीही मला कल्पना आहे. परंतु, त्याचा विचार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
चांगल्या कल्पना सुरुवातीला सर्वांनाच पटतील,अशी अपेक्षा करणे चूक आहे. तरी ही कल्पना ज्यांना योग्य वाटली त्यांनी संपर्क साधावा व चुकीची वाटत असेल तर त्यांनी चूक दुरुस्तीसाठी सूचना कराव्यात, ही विनंती. या समितीमार्फत होणारी मदत पूर्णपणे विनामूल्य असेल वकील व इंजिनियर यांची फी कमीत कमी घ्यावी असा प्रयत्न राहील,असेही शेलार यांनी सांगितले.