दीड वर्षात 'इतक्या' लाख तरूणांना रोजगार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दीड वर्षात 'इतक्या' लाख तरूणांना रोजगार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | प्रतिनिधी

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. आज नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया आणि डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध ९०० अभ्यासक्रम शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळेच आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. हीच बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही शिंदे म्हणाले.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल : लोढा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील. यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावित यांच्यासह ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com