पुणे(प्रतिनिधी)—

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पाच वाजण्याच्या

वाजण्याच्या दरम्यान या लशीच्या डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर रवाना झाले. आणखी तीन कंटेनर सकाळी दहा वाजता रवाना होणार आहेत. इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून या कंटेनर्सना मार्गस्थ करण्यात आले.

पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली जाणार आहे. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता रवाना झाले. विशेष कार्गो विमानाने या लशीचे देशात वितरण करण्यात येणार आहे.

१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. यामध्ये सुरुवातीला तीन कोटी वैद्यकीय आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ५० वर्षांपुढील लोकांना ही लस देण्यात येणार आहे, तसेच याच टप्प्यात ५० वर्षांहून कमी असलेल्या मात्र गंभीर आजार झालेल्या रुग्णांनाही लस देण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाने बनवलेल्या या लसीचे सीरम इन्स्टिट्यूट भारतात उत्पादन करत आहे. यासोबतच, या लसीचा एक डोस केवळ २०० रुपयांना उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.