नवी दिल्ली -

मुंबईसह राज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले असून पक्षाच्या वरिष्ठांसोबत

बैठका सुरु झाल्या आहेत. यामुळे आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासोबत आता काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेर बदल होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांनी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतली.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षातील अनेक नेते इच्छूक असल्याची आहेत. सध्या बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेस हाय कमांड बाळासाहेब थोरात यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे काढून घेणार का? हे पहावे लागेल. नाना पटोले आणि सुनील केदार यांची नावे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपद कोणाकडे?

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुंबईसह कोकणात दारूण पराभव झाला. मुंबईतील पक्षाची कामगिरी निराशाजनक झाल्याने माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गंत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अमरजितसिंह मनहास, भाई जगताप, सुरेश शेट्टी, नसीम खान, मधुकर चव्हाण, चरणजितसिंह सप्रा, एकनाथ गायकवाड आणि संजय निरूपम हे उमेदवार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.

जानेवारीत जिल्हाध्यक्ष बदलणार

महाराष्ट्रातील संघटनात्मक फेरबदल करण्यासंबंधी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक झाली. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्राचे प्रभारी सचिव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील संघटन फेरबदल व जिल्हा अध्यक्ष बदलण्यासंदर्भातही चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील अध्यक्ष बदलणार आहे. नागपूर विकास ठाकरे, वर्धा मनोज चांदूरकर, यांच्यासह अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार असल्याची माहिती मिळतेय.