स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच जबाबदार ; अभाविपचे आंदोलन

स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच जबाबदार ; अभाविपचे आंदोलन

पुणे |प्रतिनिधि| Pune

एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही दोन वर्षे नियुक्ती न झाल्याने आत्महत्या (Suicide) केलेल्या स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला (Swapnil Lonkar death) राज्य शासनच पूर्णतः जबाबदार (state government is fully responsible) आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे ,असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन (Movement) पुणे शहरातील विविध चौकात करण्यात येईल, असा इशारा अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी दिला.

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे केंद्र असलेले शहर काल स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या आत्महत्येने हादरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याची मुलाखत न घेतल्याने व या अनुषंगाने नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने वयाच्या २४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे २ वर्षापूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील स्वप्नील सारख्या अनेक विद्यार्थांना अद्याप नोकरी मिळाली नाही, काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले. परंतु या आंदोलनानंतर देखील राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांबाबत गंभीर नाही हे या घटनेवरून लक्षात येते असे शुभम भूतकर म्हणाले.

अभाविपच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर यास श्रद्धांजली अर्पित करण्यात आली, यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांसह अनेक एमपीएससी विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com