मुदतीपूर्व जन्मलेल्या बाळाने जिंकली करोना विरुद्धची लढाई

तब्बल ३५ दिवस झुंज
मुदतीपूर्व जन्मलेल्या बाळाने जिंकली करोना विरुद्धची लढाई

पुणे | प्रतिनिधी | Pune

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोनाने घेरले खरे परंतु या बाळाने तब्बल ३५ दिवस झुंज देत कोरोनाबरोबरची लढाई जिंकली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील भारती रुग्णालयात एका महिलेने या बाळाला मुदतीपूर्वी जन्म दिला. १.८ किलो वजन असलेल्या या बाळावर भारती रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी २२ दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर या बाळाने कोव्हिडसोबतची लढाई जिंकली आहे.

कोरोना व्हायरस-२ हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. परंतु असे अतिशय कमी रुग्ण आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहे. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात. अशीच घटना पुण्यात एका खासगी रुग्णालयात घडली. एका आईने मुदतीच्या आधी बाळाला जन्म दिला. त्याचे जन्माच्या वेळी वजन फक्त १.८ किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन देण्याची गरज होती आणि हे बाळ तपासणीअंती कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आले.

या बाळाला भारती हॉस्पिटल नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी अशा बाळांसाठी लागणाऱ्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. येथूनच बाळाची जीवन मृत्यूची लढाई सुरु झाली. अशा जन्मजात बाळांसाठी आपल्या साधारण रुग्णवाहिकेपेक्षा वेगळ्या स्पेशल रुग्णवाहिकेची गरज लागते. अशी रुग्णवाहिका भारती हॉस्पिटल येथे उपलब्ध असल्याने त्यातून बाळास भारती हॉस्पिटल येथे आणण्यात आले.

पुढील 2 दिवसात बाळाची श्वासोच्छवासाची अडचण हळूहळू वाढत गेली. बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले. हे सर्व होऊनही, बाळाला १०० टक्के ऑक्सिजन आवश्यक होता. त्याला हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. एक विशेष थेरपी (इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन) देखील दिली गेली, जे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते.

एक्सरे मध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. प्रौढांमध्ये कोव्हिड-२ची जी गंभीर लक्षणे दिसून येतात त्यासारखेच हे होते. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही कोविड-२ अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आली. म्हणजेच आईलाही कोव्हिड होऊन गेला होता. पंरतु आईला कोविड-२ ची कोणतीही लक्षणे नव्हती. हा कोरोना विषाणू-२ असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

रोगाच्या तीव्रतेमुळे आणि पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला ५ दिवस उच्च स्टिरॉइड्स डोस (मेथिलप्रेडनिसोलोन) दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. बाळ २२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिले. त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर १६ दिवसांच्या कालावधीसाठी होते. ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस २५ व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले. अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोविड-२ मधून बऱ्या झालेल्या काही प्रौढ रुग्णांमध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, ३५ व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले.

दरम्यान, अशा प्रकारच्या गंभीर आजाराची मुदतपूर्व जन्मलेल्या छोट्या बाळांमध्ये जगात कोठेही नोंद झालेली नाही. लहान मुलांमध्ये प्रौढांपेक्षा कोणत्याही आजारापासून बरे होण्याची प्रचंड क्षमता आहे हे चांगले आहे. आम्हाला आशा आहे की काही काळात बाळ या भयानक आजारामुळे झालेल्या नुकसानीवर मात करेल. भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि टीमला मनःपूर्वक धन्यवाद, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com