शुक्रवारपर्यंत मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल

शुक्रवारपर्यंत मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल
Monsoon 2021

पुणे (प्रतिनिधि) - "तौक्ते" चक्रीवादळ ओसरू लागताच, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचे संकेत मिळाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २१) मॉन्सून अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. तर रविवारपर्यंत (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर करतानाच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान 'साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम'तर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आले आहे.

अरबी समुद्रामध्ये तयार झालेले "ताऊते" अतितीव्र चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) रात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून, जमीनीवर आले. हे वादळ गुजरातमध्ये घोंगावत असून, त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जाणार आहे.

“तौक्ते" निवळू लागताच दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या भागात विषूववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरवात असून, ढगांची रेलचेल पहावयास मिळत आहे. अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो असतो. रविवारी (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली तीव्र होणार असून. मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणारआहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com