धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमान
महाराष्ट्र

धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमान

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे – 

शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गायब झालेली थंडी परतली असून तापमानात पुन्हा घसरण झाली आहे. आज कृषी महाविद्यालयात 5.2 अंशांची नोंद झाली आहे. दुसरीकडे संपूर्ण खान्देशात थंडीची लाट आली असून जळगाव जिल्हाही गारठला आहे. जळगावचे तापमान 10 अंशावर आले आहे. नागरिक थंडीने अक्षरश: गारठले आहेत.

धुळे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दि. 30 डिसेंबर रोजी किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. त्यानंतरही थंडीचा कडाका कायम होता. परंतू गेल्या तीन दिवसांपासून थंडी अचानक गायब झाली होती. उकाड्यातही वाढ झाली होती.

काल दि.9 रोजी रात्रीपासून थंडीने पुन्हा कहर केला आहे. आज दि. 10 रोजी कमाल तापमान 24.5 अंश सेल्सीअस तर किमान तापमान 5.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात झाली आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असून त्यात थंडगार वार्‍यांमुळे धुळेकरांना हुडहुडी भरली आहे.

त्यामुळे भर दुपारी ही नागरिकांना उबदार कपडे परिधान करावे लागत आहे. सकाळी आठ वाजेआधी तर सायंकाळी 6 वाजेनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सायंकाळी थंडीची तीव्रता अधिकच वाढत असल्याने रात्री रस्त्यांवरची रहदारी तुरळक झाली आहे. सकाळच्या शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी काही पालकांकडून केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com