मुंबई -

महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली अशी माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे.

पहिल्या वर्षी स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् टेक्नॉलॉजी व स्पोर्टस् कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरू होतील. नवे विद्यापीठ निर्मिती व इतर प्रशासकीय बाबींसाठी एकूण 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात 200 कोटी अनावर्ती खर्चासाठी, तर 200 कोटी कॉर्पस् फंड असेल.

राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाला मंगळवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली.राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली क्रीडा विज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आदीसह विविध क्षेत्रांत मोठ्या संधी आहेत. सोबतच क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुणवर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.हे विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून (2021-22) सुरू करण्याचा मानस आहे. पहिल्या वर्षी स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् टेक्नॉलॉजी व स्पोर्टस् कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. प्रत्येक अभ्यासक्रमात 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर मागणी व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार 5 वर्षांकरिता 213 पदे ( नियमित वेतनश्रेणीतील 166 पदे व ठोक वेतनावरील 47 पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या वर्षी 133 पदे (नियमित वेतनश्रेणीतील 100 पदे व ठोक वेतनावरील 33 पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मानधनावरील विशेष तज्ञ देखील आंमत्रित करण्याबाबत अधिनियमात तरतूद असल्याचे क्रीडामंत्री केदार यांनी सांगितले.