तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे, असे पाटील म्हणाले.

रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत , असे पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com