
नाशिक | Nashik
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी फोन केला होता, असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भुसे यांनी सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत, चौकशीमध्ये सत्य समोर येईल. तसेच माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा (A Claim For Defamation) दाखल करेल," असा इशारा मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी दिला होता.
यानंतर आता ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे (Sasoon Hospital Drug Racket) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे फोटोत दिसणारे दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवर आणले होते, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे या फोटोवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे शिंदे आणि ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आलेले फोटो हे २०१८ मधील असल्याचे बोलले जात असून हे फोटो मातोश्रीवरील आहेत. त्यावेळी ललित पाटील याने शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. या प्रवेशासाठी दादा भुसे हेच ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर २०१९ च्या निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचार रॅलीत देखील ललित पाटील दिसला होता. तसेच या फोटोत माजी मंत्री बबनराव घोलप, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे दिसत आहेत. तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत दादा भुसेंच्या उपस्थित पक्षप्रवेश करतानाचा ललित पाटील याचा फोटो दिसत आहे.
दरम्यान, आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी 'आमचे नेते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत', असे म्हणत सुषमा अंधारे यांच्या आरोपांना एकप्रकारे समर्थन दर्शविले होते. तसेच ललित पाटील या ड्रग्ज माफियाची काळजी नाशिक भागातील आमदाराने घेतली आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. या कारखान्यामार्फत त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत होती, असे म्हटले होते. त्यामुळे आता ललित पाटीलला खरंच नाशिकच्या नेत्यांची साथ आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.