शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

अवघे सोळा हजार विद्यार्थी पास

Nilesh Jadhav

संगमनेर | वार्ताहर | Sangmner

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 16,592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे.

परीक्षेचा निकाल www.mahatet.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. 19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली.दोन्ही पेपर करीता राज्यभरातून ३ लाख ४३ हजार २४२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत शेकडो चुका निघाल्याने परिषदेच्या कामावर टीका करण्यात आली होती. अखेर यातून मार्ग काढत बुधवारी निकाल जाहीर केला आहे.

'टीईटी'च्या पेपर एकसाठी (इयत्ता १ली ते ५वी गट), १ लाख ८८ हजार ६८८ पैकी १० हजार ४८७ जण पात्र झाले आहेत. तर पेपर दोनसाठी (इयत्ता ६वी ते ८वी गट) १ लाख ५४ हजार ५९६ परीक्षार्थींपैकी ६ हजार १०५ जण पात्र झाले आहेत. आत्तापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील ८६ हजार २९८ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहे. या परीक्षेच्या निकालाबाबत आरक्षण, वैकल्पिक विषय, अपंगत्व यासह इतर सुविधांचा लाभ मिळाला नसल्यास १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन तक्रार पुराव्यासह करावी, असे आवाहन परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com