तोक्ते चक्रीवादळ : राज्य सरकार सज्ज ; मुख्यमंत्र्यांची केंद्राला माहिती

तोक्ते चक्रीवादळ : राज्य सरकार सज्ज ; मुख्यमंत्र्यांची केंद्राला माहिती

नवी दिल्ली - अरबी समुद्रातील तौकते चक्रीवादळामुळे सागरी किनार्‍यांवरील जिल्ह्यांना पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून राज्यातील प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिली आहे.

तोक्ते चक्रीवादळ आणि करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या तयारीबद्दलची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे. किनार्‍यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिसांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाचा इतर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी व्यवस्थित समन्वय आहे.

विशेषतः करोना परिस्थितीत रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रे ही पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनार्‍यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणार्‍या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com