साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घ्यावा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साखर उद्योगाला आवाहन
साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घ्यावा

मुंबई । प्रतिनिधी

राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन आज उध्दव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असे सांगितले.

कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू. राज्यातील विविध महानगरपालिकांनी ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ऑक्सिजन निर्मितीसाठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. तर कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com