
पुणे | Pune
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar) यांच्या सुनबाई आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष विक्रम सावरकर (Vikram Savarkar) यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर (Swamini Savarkar) यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले आहे...
स्वामिनी सावरकर यांनी विक्रम सावरकर यांना त्यांच्या संघटनात्मक कार्यात मोलाची साथ दिली होती. स्वामिनी यांच्या जाण्याने त्या संघटनांची मोठी हानी झाली. स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले म्हणून परिचित होत्या.
नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचे लग्न नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्याशी झाला. 'प्रज्वलंत' या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज स्वामिनी या पाहत होत्या.
मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेचे कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. विक्रमराव सावरकर यांच्या 'युद्ध आमुचे सुरु' तसेच 'कवडसे' या पुस्तकांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्याचे काम स्वामिनी सावरकर यांनी केले.