मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांवर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सुनावणीकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्य सरकारच्यावतीने मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायलयात ही याचिका लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तज्ज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात येत आहे. हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली आहे.

त्यासोबतच आता दिग्गज वकिल कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादा हेही युक्तीवाद करणार आहेत.

यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात 7 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली होती. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपली बाजू ठोसपणे मांडली होती. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरू झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने यावेळी मांडली.

1 डिसेंबर 2018 पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं.

Deshdoot
www.deshdoot.com