अन्य राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करा

अन्य राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यातून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची म्हणजे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी येथे दिली.

आजघडीला राज्यात ६ लाख ८५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.

राज्यात एकूण १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे. केंद्र सरकार सुमारे ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली.

आणखी ३ हजार खाटा

पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आरसीएफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. हा ऑक्सिजन रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्याय तीन हजार खाटांची भर पडणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com