ऊसतोड कामगारांना लवकरच मिळणार विमा कवच

राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची माहिती
ऊसतोड कामगारांना लवकरच मिळणार विमा कवच

मुंबई -

करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याचे प्रयत्न असून त्या संदर्भात बुधवारी मुंबई येथे बैठक झाली आहे. पुढील काही

दिवसांतच ऊसतोड विमा देण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.

या संदर्भात राज्य साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी सांगितले की, राज्यात 100 सहकारी तर 87 खाजगी कारखाने आहेत. या कारखान्यांमधून सुमारे 6 लाख ऊसतोड कामगार काम करतात. सधारणतः नोव्हेंबर ते एप्रील महिन्यापर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम चालतो. सध्या करोना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा साखर कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांसोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून सरकार व सहकारी कारखाने दोघे मिळून कामगारांचा विमा भरण्याचे नियोजन आहे. एका कामगाराचा साधारणतः 700 ते 1000 रुपये विमा रक्कम येणार आहे. त्यातून कामगारांवर करोनामुळे दुर्देवी प्रकार ओढवल्यास त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 लाख रुपये मिळाले पाहिजेत असे प्रयत्न आहेत.

त्यानुसारच विमा रक्कम ठरवली जाणार आहे. काही विमा कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार 6 महिने, 9महिने व 1 वर्षाच्या कालावधीचा विमा असणार आहे. या शिवाय कोवीड झालेल्या कामगारांवर मोफत उपचार करण्याबाबतचे नियोजन असल्याचेही दांडेगावकर यांनी सांगितले. या संदर्भात सहकारी साखर कारखान्यांना पत्र पाठवून कामगारांचा विमा काढण्याचे नियोजन असल्याचे कळविले होते. त्यामध्ये 100 पैकी एकाच दिवशी 70 कारखान्यांनी या संदर्भात पत्र देऊन यासाठी होकार दर्शविला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com