साखर कामगारांच्या महागाई भत्त्यात 102 तर पीएफमध्ये 300 रुपये कपात
महाराष्ट्र

साखर कामगारांच्या महागाई भत्त्यात 102 तर पीएफमध्ये 300 रुपये कपात

पगार कायमस्वरूपी 102.60 रुपयांनी कमी होणार

Dhananjay Shinde

सार्वमत

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - राज्यातील साखर कामगारांच्या महागाई भत्त्यात 102 रुपये 60 पैसे तर भविष्य निर्वाह निधीमध्ये 300 रुपयांची कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे साखर कामगारांचा पगार कायमस्वरूपी 102.60 रुपयांनी कमी होणार आहे.

कामगारांच्या अखिल भारतीय सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकावर अधारित दि. 1 जुलै 2020 पासून महागाई भत्त्यातील बदल झाला आहे. माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यासाठी देण्यात येणार्‍या महागाई भत्त्यात वाढ होण्याऐवजी किंवा वाढ रोखण्याऐवजी 102 रुपये 60 पैशाने सध्याची जून 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या महागाई भत्त्यातून 102 रुपये 60 पैसे कमी केले आहेत.वेळोवेळी राज्य पातळीवर साखर कामगारांच्या मागण्या संदर्भात झालेल्या करारानुसार वरील पध्दतीने सुधारीत दराने महागाई भत्ता कळविण्यात येतो.

फेब्रुवारी 2020, मार्च 2020 आणि एप्रिल 2020 या तीन महिन्यांचे निर्देशांक तीन महिन्यांची सरासरी 7479.28 अंश म्हणजे 7479 अंश आहे. सध्या महागाई भत्ता अखिल भारतीय सरासरी ग्राहक निर्देशांक 7517 प्रमाणे देण्यात येतो. म्हणजेच सध्याच्या सरासरी ग्राहक निर्देशांक 38 अंशांनी कमी झाला आहे.

माहे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांसाठी सरासरी निर्देशांक 2069 अंशाकरिता महागाई रु.5586.30 देण्यात येत आहे. जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी सरासरी निर्देशांक 2031 अंश येतो. तसेच मागील तिमाहीच्या सरासरी निर्देशांक 38 अंशांनी कमी झाला आहे.सदरहू महागाई भत्त्यातील बदल दि. 1 जुलै 2020 ते दि.30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी साखर कामगारांच्या सर्व वर्गासाठी आहे.

दि.04 जुलै 2016 चे कराराचे तरतुदींनुसार 2031 अंशासाठी प्रति अंश रु.270 प्रमाणे महागाई भत्ता रु.5483.70 येतो. म्हणजेच मागील तिमाहीच्या तुलनेत 38 अंशांनी निर्देशांक कमी झाल्यामुळे (38 अंश ु रु.270 102 रुपये 60 पैसे) पगार कमी होणार आहे.

भविष्य निर्वाह निधी 3 महिन्यांसाठी होणार 2 टक्क्याने कमी...देशातील उद्योगांला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात तात्पुरता दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी भविष्यनिर्वाह निधीत 2 टक्के कपात करण्याच्या निर्णय घेतलेला आहे. याचा राज्यातील साखर कामगारांच्या बचतीवर थेट परिणाम होणार आहे.सध्या राज्यातील साखर कामगारांच्या पगारातून दरमहा 15 हजार रुपये रकमेवर 12 टक्के म्हणजे 1800 रुपये भविष्य निर्वाह निधी कापला जातो.कामगाराच्या रकमे इतकीच 1800 रुपयांची रक्कम आस्थापन(संस्था) भागीदारी करते. परंतु केंद्र सरकारने 3 महिन्यासाठी निधीमध्ये 2 टक्के कपात न करण्याची सवलत दिल्याने साखर कामगारांची दरमहा प्रत्येकी 600 रुपये व 3 महिन्यांसाठी 1800 रुपये भविष्य निर्वाह निधीची बचत व सेवानिवृत्ती वेतनाची भागीदारी कमी होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com