ताडोबासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
ताडोबासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ताडोबा (Tadoba National Park ) हे वाघ ( Tiger ) बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टी पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा Integrated tourism development plan तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray )यांनी गुरुवारी वन विभागाला (Department of Forest) दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जावा, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करताना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निमिर्तीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे. येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी जेणेकरून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल.

वन अकादमीनजीक जे वन्यजीव रेस्क्यु सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झु ॲथॉरिटीची मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरीत करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एकूण ६४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. चालू आणि येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

या बैठकीला मदत आणि पनुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, प्रभारी वनबल प्रमुख वाय.एल.पी.राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com